मराठवाड्याच्या सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रात किशोरदादा शितोळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. आपल्यावर सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्या उत्कृष्टरीत्या सांभाळून त्यांनी प्रत्येक क्षेत्राला न्याय दिला.
किशोरदादा शितोळे यशस्वी उद्योजक आहेत. त्यांचे बालपण ग्रामीण भागात गेले. फुलंब्रीत त्यांनी शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेऊन ते सिव्हिल इंजिनिअर झाले. कुठल्याही कामाचे पक्के नियोजन आणि त्यानुसार कार्यप्रणाली आखली तर त्या कार्यात नक्कीच यश मिळते, यावर श्री. शितोळे यांचा विश्वास आहे. त्यांची आजवरची वाटचालही त्यानुसारच झाली.
ग्रामीण जनजीवनाचे प्रश्न, तेथील लोकांच्या समस्या, कृषीवर आधारित अर्थचक्र हे सगळे त्यांनी जवळून अनुभवले आहे. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यातील संघटन वृत्तीचा त्यांना खूप फायदा झाला. शिक्षणातील अडचणी, युवकांचे प्रश्न जाणून ते हाताळत असताना त्यांनी अभ्यासाला मात्र नजरेआड होऊ दिले नाही. विशेष प्रावीण्यासह त्यांनी `सिव्हिल इंजिनिअर`ची पदवी मिळवली.
श्री. किशोर शितोळे यांची व्यवस्थापकीय दूरदृष्टी, त्यांच्यातील अभ्यासू वृत्ती आणि कुठलेही काम अथक प्रयत्नांतून तडीस लावण्याची त्यांची धमक फार काळ लपून राहिली नाही. कालांतराने त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी येऊन पडली.
ती म्हणजे मराठवाड्यात अग्रगण्य असलेल्या देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची.
श्री. किशोर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली आज या बँकेची वाटचाल प्रगतिपथावर आहे. बँकेने नुकताच 2 हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या विविध ठेव योजना, कर्ज योजना, सेवा-सुविधांमुळे आज ही बँक लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
श्री. शितोळे यांचा शिक्षण क्षेत्रातील वावर, विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना आणखी एक जबाबदारी देण्यात आली. सध्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. यातून त्यांनी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न हाताळले. शिक्षण क्षेत्रात नवनवीन सुधारणा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
श्री. किशोर शितोळे उत्कृष्ट वक्ते आहेत. अभ्यास आणि वाचनाची आवड असल्यामुळे माहितीचा खजिनाच त्यांच्याकडे असतो. समाजाच्या विविध घटकांची स्थिती त्यांनी जवळून अनुभवली आहे. समाजातील आर्थिक विषमता, बेरोजगारी, तळागाळातील लोकांच्या समस्या, त्यावरील उपाय याविषयी ते नेहमी बोलतात. टीव्हीवरील विविध चर्चासत्र कार्यक्रमांतून श्री. शितोळे हे भारतीय जनता पक्षाची अभ्यासपूर्ण मते मोठ्या कौशल्याने मांडतात. तसे शांत व संयमी स्वभावाचे किशोरदादा भाजपचे प्रवक्ता म्हणून बोलत असताना अनेकदा आक्रमकही होतात. आपल्या मुद्द्यावर ठाम राहून ते विरोधकांना पुरून उरतात.
किशोरदादा शितोळे हे उत्कृष्ट लेखक आणि व्याख्याते आहेत. व्यासपीठावर किशोरदादा यांची उपस्थिती असेल तर प्रेक्षकही खिळून राहतात. त्याचे कारण असे की, किशोरदादांची ओघवती वक्तृत्व शैली. अतिशय हलक्याफुलक्या शब्दात जनसामान्यांच्या ह्रदयाचा ठाव घेणारे त्यांचे भाषण असते. सोशल मीडियावर आणि इतरही माध्यमांतून त्यांनी अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा, नरम-गरम, खुमासदार चर्चांचा आनंद आपण सगळेजण घेत असतो. सामान्यांना सहजपणे शिकवण देणारी त्यांची वाणी व लेखणी त्यामुळेच सर्वांना हवीहवीशी वाटते.
श्री. किशोर शितोळे सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. जलदूत या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून त्यांनी मराठवाड्यातील प्रमुख पाणीप्रश्नावर महत्वपूर्ण कामे केली आहेत. मराठवाड्यातील जलदूत म्हणून ते ओळखले जातात. जलदूत या एनजीओच्या माध्यमातून त्यांनी युवकांना व शेतकऱ्यांना एकत्र करून गावखेड्यांमध्ये नदी-नाला खोलीकरण, बारवांचे पुनरुज्जीवन, फेरोसिमेंट बंधारे बांधणे अशी अनेक कामे केली आहेत. जलसाक्षरता, जलसंवर्धनाची चळवळ ते अनेक वर्षांपासून राबवीत आहेत.