मराठवाड्याच्या सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रात किशोरदादा शितोळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. आपल्यावर सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्या उत्कृष्टरीत्या सांभाळून त्यांनी प्रत्येक क्षेत्राला न्याय दिला.
किशोरदादा शितोळे यशस्वी उद्योजक आहेत. त्यांचे बालपण ग्रामीण भागात गेले. फुलंब्रीत त्यांनी शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेऊन ते सिव्हिल इंजिनिअर झाले. कुठल्याही कामाचे पक्के नियोजन आणि त्यानुसार कार्यप्रणाली आखली तर त्या कार्यात नक्कीच यश मिळते, यावर श्री. शितोळे यांचा विश्वास आहे. त्यांची आजवरची वाटचालही त्यानुसारच झाली.
ग्रामीण जनजीवनाचे प्रश्न, तेथील लोकांच्या समस्या, कृषीवर आधारित अर्थचक्र हे सगळे त्यांनी जवळून अनुभवले आहे. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यातील संघटन वृत्तीचा त्यांना खूप फायदा झाला. शिक्षणातील अडचणी, युवकांचे प्रश्न जाणून ते हाताळत असताना त्यांनी अभ्यासाला मात्र नजरेआड होऊ दिले नाही. विशेष प्रावीण्यासह त्यांनी `सिव्हिल इंजिनिअर`ची पदवी मिळवली.